Thursday, January 16, 2020

पातळ पोह्यांचा चिवडा- (मायक्रोवेव्ह मधे)

पातळ पोह्यांचा चिवडा- (मायक्रोवेव्ह मधे)

1. 2 वाट्या पातळ पोह्यांत 1 वाटी चुरमुरे ( ऐच्छिक ) व अंदाजानुसार मीठ, पिठीसाखर, चिली फ्लेक्स मिसळा.
2. गॅसवर 2 टेस्पून तापलेल्या तेलात मोहरी टाका, ती तडतडली की त्यात कडीपत्ता व हिरवी मिरचीचे तुकडे टाका व गॅस बंद करा. नंतर त्यात तीळ, दाणे, सुके खोबरे काप, हिंग व हळद घालून फोडणी करा. फोडणी गार झाल्यावर ती पोहयात सगळीकडे नीट मिसळा.
3. काचेच्या पसरट भांड्यात हे मिश्रण घ्या, मिडीयम पॉवरवर 7-8 मिनिटे मायक्रोवेव्ह करा. मधे मधे 2 - 2 मिनिटांनी हलवा.
4. बाहेर काढल्यावर भाजके डाळे मिसळा. गार झाल्यावर बरणीत भरा.

*भाजक्या पोह्यांचा चिवडा*
पातळ पोह्यांचा चिवडा प्रमाणे, फक्त खालीलप्रमाणे बदल करा.
1.  पातळ पोह्यां एेवजी भाजकें पोहे घ्या व त्यात मीठ साखरेबरोबर गरम मसाला, थोडी धनेजिरे पूड व थोडी आमचूर पावडर मिसळा.
2. उभा, पातळ चिरलेला व 1 दिवसभर वाळवलेला कांदा दाणे खोबऱ्याबरोबर फोडणीत टाका.

*डाएट चिवडा*
पातळ पोह्यांचा चिवडा प्रमाणे, फक्त खालीलप्रमाणे बदल करा.
1. डाएट चिवड्याचे वेगळे पोहे मिळतात ते वापरा, थोडेसेच दाणे व पातळ सुके खोबरेकाप घाला.
2. कमी तेलात कमी अगदी प्रमाणात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून ती वापरा.

विक्रीसाठी स्पेशल टिप्स -
1. चिवड्यामधे फोडणी, मीठ, साखर ई. साहित्य मिसळून चिवड्याचे कच्चे मिश्रण मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवा. ऑर्डर येईल त्यानुसार तेवढेच मिश्रण मायक्रोवेव्ह करा.

Wednesday, January 15, 2020

तिळगुळ वडी

शुभ संक्रमण

बऱ्याच कालावधीनंतर, आज दिनांक 15 जानेवारी 2020 मकर संक्रांति पासून ब्लॉग पुन्हा लिहायला सुरुवात करायचा संकल्प केला आहे. विषय जरी खाद्यपदार्थांचा असला तरी वेगळ्या स्वरूपात लिहायचा मानस आहे. 'शिका आणि कमवा' म्हणजेच 'लर्न अँड अर्न असे काहीसे या लिखाणाचे स्वरूप असणार आहे. इथे पाककृती तर आहेच पण ती अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदा चांगले जमायला लागल्यावर तो पदार्थ विक्रीसाठी लहान मोठ्या प्रमाणात करता येईल अशा पद्धतीने लिहिली जाणार आहे.

'क्विक, इझी, हेल्दी, टेस्टी' म्हणजेच 'झटपट, सोपे, आरोग्यदायक आणि आणि स्वादिष्ट, हे आपले ब्रीदवाक्य आहे.

आज आज संक्रांतीच्या निमित्ताने आपण पहिला तिळगुळ किंवा तिळाची वडी करायला शिकूया.

तिळगुळ वडी - (मायक्रोवेव्हमध्ये)

साहित्य -
1. एक वाटी पांढरे तीळ
2. अर्धी वाटी भाजलेले दाणेकूट
3. पाउण वाटी बारीक चिरलेला गूळ
4. एक चमचा तूप
5. अर्धा चमचा जायफळ पूड

इतर सामान-
मायक्रोवेव्ह सेफ काचेचे भांडे, पोळपाट, लाटणे, सुरी, इत्यादी

कृती-
1. काचेच्या मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात तीळ घ्या, प्रथम दोन मिनिटे मायक्रोवेव करा, नंतर एक एक मिनिटाने हलवत एकूण चार ते पाच मिनिटे मायक्रोवेव्ह करा व ते थोडे गार झाल्यावर मिक्सर मधून जाडसर वाटा आणि त्यात दाण्याचा कूट व जायफळ पूड मिसळून ठेवा. (दाणे भाजलेले नसल्यास  तिळाप्रमाणेच मध्ये मध्ये हलवत भाजून घ्या व गार झाल्यावर मिक्सरमधून पूड करा. वाटीभर दाणे तीनचार मिनिटात भाजून होतात)
2. पोळपाट लाटणे व सुरी यांना थोडेसे तूप लावून ठेवा.
3. काचेच्या त्याच भांड्यात गुळ घ्या, त्यावर एक छोटा चमचा पाणी व उरलेले तूप टाका. भांडे ओव्हन मध्ये ठेवून दोन मिनिटे लाऊन मायक्रोवेव्ह सुरु करा. गूळ पूर्ण विरघळला व बुडबुडे दिसू लागले की पाक झाला असे समजा व ओव्हन लगेच बंद करा.
4. भांडे बाहेर काढून त्यात तिळाचे मिश्रण टाका व हलवून गोळा एकजीव करा. नंतर तो गोळा पोळपाटावर काढा लाटण्याने लाटा सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापा. गार झाल्यावर वड्या सुट्ट्या करा.
( वड्या मायक्रोवेव ऐवजी गॅस वर करायच्या असल्यास प्रमाण हेच वापरावे.)

विक्रीसाठी स्पेशल टिप्स-
1. वरील प्रमाण हे शिकण्यासाठी आहे, याच प्रमाणाने आणखी चार-पाच वेळा करून पहा म्हणजे वड्या हुकमी एक सारख्या जमायला लागतील. त्यानंतर विक्रीसाठी दुप्पट-तिप्पट प्रमाणाने वड्या करता येतील.
मायक्रोवेव्हमध्ये दुप्पट प्रमाणाने वड्या करायच्या असल्यास वेळ दीडपट करावा तर तिप्पट प्रमाणाने करायचा असल्यास वेळ दुप्पट करावा. भांडे साधारण अर्धे ते पाऊण भरेल एवढे प्रमाण एका वेळेस घेता येते, मध्ये एक एक मिनिटाने हलवायला मात्र विसरू नये.
2. वड्या एक सारख्या आकाराच्या कापण्यासाठी रुंद पट्टी किंवा ती नसल्यास जाड कागदाची एक दीड इंच रुंदीची पट्टी कापून लाटलेल्या पोळीवर ठेवून त्याच्या बाजूने सुरीने आखून घेऊन वड्या कापा.
3. पॅकिंग 100 किंवा 200 ग्राम चे करा. ते साधेच असले तरी नीटनेटके व आकर्षक असावे. त्यावर वजन, किमतीचे लेबल, तयार केल्याची तारीख इत्यादी गोष्टींचा उल्लेख असावा.
4. संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देतानाच आपण विक्रीसाठी सुद्धा वड्या करीत असल्याची माहिती द्यावी व सुरुवातीला अशा पद्धतीने तोंडो तोंडी प्रचार करावा. पदार्थ चांगला असल्यास त्याचा प्रचार आपोआप दहा तोंडांनी होतो व मागणी वाढत जाते.